पहाटपावलं (– डॉ. सुनील दादा पाटील)-समीक्षक- आबासाहेब मारुती सूर्यवंशी

एक सुंदर मराठी काव्यसंग्रह – पहाटपावलं

सौ. मनिषा पिंटू वराळे यांच्या भावनांचा प्रवाह वाहत वाहत गेला आणि त्याचा ‘हाटपावलं’ नावाचा ‘भावसागर तयार झाला. या भावसागरात डुंबायचा योग आज मला       कवितासागर पब्लिशिंग हाऊस, जयसिंगपूर येथील प्रकाशन संस्थेचे तरुण प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील यांच्यामुळे मिळाला. कविता लिहिणे व कवितांचासंग्रह करणे यासाठी काही शिक्षण घेणे गरजेचे आहे किंवा लिहायला वाचायला येणे आवश्यक असते या समजुतीपेक्षा फक्त एक संवेदनशील मन व उत्कट भाव ज्यांच्या जवळ असतात तो किंवा ती उत्तम प्रकारचं काव्य करू शकतात. हे या कवितासंग्रहावरून सिद्ध होते. 

प्रेम काव्य किंवा विरह काव्य अशा काव्य वाटा शोधून बरेच कवी आपला काव्य प्रपंच उभारतात त्या त्या वाटेवरचे त्यांचे भावविश्व त्यांना तसे करायला भाग पाडते. उत्कट प्रेम व्यक्त करायला त्या कवीने त्या प्रेमाचा अनुभव घेतलेला असेल तर ते काव्य अत्यंत मनाच्या खोल तळातून अंकुरित होते व वाचकाला ते मनापासून भावते. सौ. मनिषा वराळे यांनी लिहिलेल्या या कवितासंग्रहातील प्रत्येक कविता ही त्यांनी अनुभवलेली आहे. या अनुभवातून न्हाऊन त्या निघालेल्या आहेत असे वाटते. जीवनातले कटू गोड अनुभव म्हणजेच आपले जीवन. संस्कारित जीवनाची सुरुवात आपल्या आईपासून होते. आपल्या भावंडांच्या सानिध्यात व्यतीत केलेल्या आपल्या बाल मनातून संस्कारित जीवन उगवते. ज्यांची बालमने अशा संस्कारित आईने, भावंडानी व नातलगांनी घडविलेली असतात अशा व्यक्ती पुढे आपल्या आयुष्यात अत्यंत संवेदनशील व भावूक बनतात. अशा व्यक्ती फार मोठ्या शिक्षणाशिवाय आपसूकच कवितेमध्ये बोलतात व कविता करतात.   

सौ. मनिषा वराळे यांच्या कवितांचा अभ्यास करता असे लक्षात येते की, त्यांच्या कविता ‘आई’ कडे अधिक कललेल्या आहेत आणि इतर नात्यांच्या विषयी कर्तव्य कठोर असल्याचा भाव त्यांच्या कवितामधून जाणवतो. अपेक्षा एक असणे व घडणे वेगळेच असे अनुभवातले काहीतरी त्यांच्या काव्यातून जाणवते. काव्यातून निरलस भाव, तरल भावना व जीवनातले सत्य प्रकट होणे हे अपेक्षित असते. हे सर्व सौ. मनिषाताईंनी आपल्या कवितांमधून दिलेले आहे असे मला वाटते. 

‘तुझं असणं’ या कवितेत सौ. मनिषा वराळे म्हणतात,

रक्ताचं पाणी करून वाढवणारी आई असते,

उदरात नऊ महिने वागवणारी आई असते,

स्वतः उपाशी राहून खाऊ घालणारी आई असते,

म्हणून त्या आईसाठी…

तूच बनवलंस मला वाघीण झुंजार,

जरी दमले तरी तुला व्यथा नाही सांगणार…

हे काव्य, तसेच ‘मैत्री’ या कवितेत,

फुलाप्रमाणे दरवळत राहणारी, पण कधी न तुटणारी

तार्‍याप्रमाणे चमकत राहणारी, अशी असावी आपली मैत्री

या काव्यातून नातं कसं स्वच्छ, त्यागी, निस्वार्थी व प्रेमळ असावं हे सांगतात.

‘मैत्रीण’ हे नातं रक्तातून आलेलं जरी नसलं तरी भावविश्वातलं ते एक नाजूक कोंदण असतं. मैत्री या नात्यावर त्यांनी रहस्य, मैत्री, दिशा, तुफान काळजातले, आक्रंदन, अनजान, खेळणं, पत्थरदिल, प्लॅनिंग, मैफिल माझी सुनी, तिच्याच सारखी वेडी इत्यादी व अन्य काही कविता या एका बाह्य नात्यावर रचलेल्या आहेत. यावरून असे वाटते की, त्यांनी एखाद्यावर प्रेम केले तर ते किती खोल व उदात्त असावे याचे उदाहरण देण्यासाठी काव्येच सादर केलेली आहेत.

‘मैत्री’ हे एकच नाते असे आहे की, त्यास वयाचा, परिस्थितीचा, धन दौलतीचा, कमी अधिकपणा कधीच अडचणीचा ठरला नाही. राग, लोभ, रुसणे, फुगणे, रडणे, समजावणे या क्रिया प्रेमाच्या ओलाव्याने भिजवून हळुवारपणे नाजूक बोटांनी हाताळायच्या असतात त्या फक्त याच नात्यात. इथे दडवणे, लपवणे, उघडे करणे या भावना बंधमुक्त होवून या भावनांचा अजिबात संसर्ग नसतो. या भावना सौ. मनिषा वराळे यांनी उत्तम प्रकारे मांडल्या आहेत.

‘बंदिवान या संसारी’ या कवितेत ‘मुलीचा जन्म लग्नापूर्वी व नंतर’ यावर प्रकाश टाकला आहे. प्रत्येक मुलीला समजूतदारपणा येण्यापूर्वी आईचे घर व तो आल्यानंतर परक्याचे घर अशा परिस्थितीतून जावे लागते तिच्या नशिबाने नंतरचे जीवन सुखी होते की दु:खी होते हे मात्र तिला माहित नसते. सौ. मनिषाताईंनी, एका विवाहितेने व तत्पूर्वी एका कुमारिकेने दोन्ही घरे कशी घडवायची असतात हे त्यांच्या कवितांच्यामधून उलघडून सांगितले आहे.

त्या स्वतः यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या पदवीधर असून आरोग्य खात्यात सद्या कार्यरत आहेत. अत्यंत जवळून त्यांनी माणूस, त्याच्या वेदना, संवेदना, मानवी नात्यांची सफलता व विफलता या सर्व प्रसंगांना जीवनात तोंड दिलेले असावे असे वाटते. निसर्गत: त्यांना काव्याची जाण, शब्दांची जुळवण, यमकांची मिळवण व मुक्तछंदाचे भान या सर्व बाबींची जाणीव असलेने त्यांनी साधारण पंच्चावन पेक्षा अधिक कवितांचा गोड संग्रह करून तो जनमानसात सादर केला आहे.

आजच्या घडीला काव्य लिहिणे, ते जुळवणे हे कदाचित प्रयत्न करणार्‍याला जमून जाते. पण कवितांचे पुस्तकात रुपांतर करणे हे मात्र त्याच्या आवाक्याच्या बाहेरचे असते. धरणगुत्ती हे जयसिंगपूर नजीकचे एक लहानसे गाव. डॉ. सुनील दादा पाटील हे एक तरुण, जिज्ञासू, शोधक प्रकाशक धरणगुत्ती जवळच्या संभाजीपूर (दक्षिण) मध्येच राहतात आणि त्यांच्या नेत्र कटाक्षातून अशी प्रतिभा संपन्न कवयित्री सुटून जाणे केवळ अशक्य – प्रायच! सौ. मनिषाताईंचे ‘शब्दकळा’, ‘परिमळ’ हे दोन काव्यसंग्रह डॉ. सुनीलनीच यापूर्वी प्रसिद्ध केलेले असल्याने हा तिसरा काव्यसंग्रह ‘पहाटपावलं’ प्रसिद्धीच्या झोतात असणे हे काही आश्चर्य नाही.

सौ. मनिषा पिंटू वराळे या प्रयत्नवादी कवयित्रीला व त्यांना खंबीर साथ देणार्‍या पिंटू वराळे या त्यांच्या पतिराजांना तसेच त्यांच्या सासूबाई, सासरे, मुले मुली या सर्व कुटुंबियांना, सौ. मनिषा यांना साथ दिल्याबद्दल व त्यांना प्रोत्साहन देवून कवयित्रीच्या रुपात उभे केल्या बद्दल निश्चितच मला त्यांचे कौतुक वाटते त्याबद्दल त्यांना मन:पूर्वक धन्यवाद. प्रस्तावना लिहिण्यासाठी माझी निवड केल्याबद्दल कवयित्री सौ. मनिषा पिंटू वराळे व प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील या दोघांनाही धन्यवाद देवून माझे प्रास्ताविकपर पुरे करतो.                   

आबासाहेब मारुती सूर्यवंशी,

ज्येष्ठ लेखक – समीक्षक – संपादक 

संपर्क – ९४२१५४७४३०, 9975873569  


डॉ. सुनील दादा पाटील (Ph. D.) संचालक – कवितासागर साहित्य अकादमी, जयसिंगपूर प्रकाशक – कवितासागर पब्लिशिंग हाऊस, जयसिंगपूरसंपादक – मासिक कविता सागर – आंतरराष्ट्रीय मानक क्रम संख्या (आय एस एस एन) ISSN2349-0446Dr. Sunil Dada Patil (Ph. D.) 02322 – 225500, 09975873569, 08484986064

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
LinkedIn
INSTAGRAM