उत्तम ग्रामीण कथासंग्रह – घडलं हे मात्र खरं होतं…– डॉ. सुनील दादा पाटील

Sunildada Patil 3:27 PM (1 hour ago)

उत्तम ग्रामीण कथासंग्रह – घडलं हे मात्र खरं होतं…!

ज्ञानियाच्या पालखीचे, आम्ही सारे खांदेकरी ।

उधळू फुले ओंजळीने, अंधाराच्या वाटेवरी ॥

प्रत्येक व्यक्तीचं आयुष्य हे वेगवेगळं असतं. आयुष्यात असंख्य प्रसंग, अनेक अनुभव, अनेक व्यक्ती, काही आयुष्यभरासाठी तर काही वर्षभरासाठी, काही महिन्यासाठी, दिवसासाठी किंवा मिनिटाक्षणासाठी आपल्या सानिध्यात आलेले असतात आणि एक वेगळा आनंद देऊन गेलेले असतात. काही प्रसंग दु:खही देऊन गेलेले असतात. सगळेच प्रसंग आपल्या ध्यानात राहत नाहीत. ठळक, अमुलाग्र बदल घडवून आणणारे, आयुष्यास कलाटणी देणारे मोजकेच प्रसंग, अनुभव किंवा व्यक्ती मात्र आपण कधीच विसरत नाही.

विद्यार्थीदशा ही विसरणारी अवस्था असते. खेळण्या-बागडण्यात दिवस कसे भुर्रकन निघून जातात हे समजत नाही. शिक्षकी पेशात मात्र प्रौढत्व, जबाबदारी आणि विद्यार्थ्यांची काळजी यांचे मनावर मोठे ओझे असते. शिक्षक किंवा गुरु आपल्याला जेजे अनुभव आले त्या सर्वांचा वापर आपल्या अध्यापनात करतात. अर्थात त्यांना अशा प्रसंगाची नोंद ठेवावी लागते, विसरून चालत नाही.

जेथे गुरु तेथे ज्ञान, जेथे ज्ञान तेथे आत्मदर्शन ।

जेथे आत्मदर्शन, तेथे समाधान ॥       

गुरुविण कोण दाखवील वाट, गुरूचा महिमा आगाध. आता मी ज्या पुस्तकाला नव्हे कथासंग्रहाला प्रस्तावना देत आहे तो कथासंग्रह, ती कलाकृती एका गुरूने निर्माण केलेली आहे. लेखक सुनील कृष्णा आसवले हे कर्मवीर भाऊराव पाटील द्वारा स्थापित रयत शिक्षण संस्थेत कार्यरत असणारे एक शिक्षक. अत्यंत मनमिळाऊ, अनेक मित्र-सोबती, विद्यार्थी-पालक यांच्या प्रेम कोशात नेहमी राहणारे एक जन्मजात लेखक. गडहिंग्लज तालुक्यातील नरेवाडी नावाच्या एका लहान खेड्यात बालपण व्यतीत केल्याने ग्रामीण जीवनाचे अनेक अनुभव गाठीशी बांधून अध्यापनातून जस-जसा वेळ मिळेल तस-तसे त्यांनी आपले लेखन चालू ठेवून हा एक अत्यंत देखणा कथासंग्रह आपल्या वाचनासाठी सुपूर्द केला आहे. या त्यांच्या कथा नसून त्यांनी त्यांच्या शिक्षकी पेशातल्या, सार्वजनिक जीवनातल्या घटना मनमोकळ्या गप्पांच्या स्वरुपात आपल्यापुढे मांडल्या आहेत.

एकूण बावीस अनुभवकथांचा हा संग्रह असून बरेच अनुभव सिद्धहस्त सत्य स्वरुपात आहेत. कोकणातल्या वास्तव्यात एका विलक्षण अनुभवाच्या लेखनातून जी कथा साकार झाली त्या ‘घडलं हे मात्र खरं होतं…!’ या कथेचे शीर्षक या संग्रहास देण्याची त्यांची कल्पना मला खूपच आवडली.

विशेष म्हणजे त्याच्या बर्‍याच कथांचे आकाशवाणी वरून प्रसारण झालेले आहे. त्यांनी स्वतः सांगली आणि कोल्हापूर आकाशवाणीवरून त्यांच्या कथांचे प्रकट वाचन केले आहे. यावरून त्यांच्या कथनाचा दर्जा आपणास नक्कीच समजून येतो.

त्यांच्या बर्‍याच कथा ग्रामीण ढंगाच्या, ग्रामीण बोलीच्या आणि ग्रामीण जीवनाशी नाळ असणार्‍या आणि वाचकांच्या मनाची पकड नक्की घेणार्‍या आहेत. ‘थोरली आई’, ‘कोंबडी उडाली भुर्र ऽ ऽ’, ‘दत्तूमामा’, ‘गवत्या’ या सारख्या कथा निश्चितच खेड्यात राहिलेल्या वाचकाला आवडतील याची खात्री आहे.

 कथालेखक सुनील आसवले यांनी हे प्रसंग कथेच्या धाटणीत केवळ लिहायचे म्हणून लिहिले नाहीत तर त्यातून वाचकांना काहीतरी संदेश जावा, मार्गदर्शन मिळावे, ज्ञान मिळावे, संस्कार मिळावेत हा दृष्टिकोन ठेवून एका गुरूच्या भावनेतून सदर लेखन केलेले आहे. ‘दत्तुमामा’ मध्ये एका भोळ्या भाबड्या युवकाची कथा की, जो बकरी कापून देण्याच्या कामात व्यस्त असतो त्याची कथा रंगवलेली आहे. ‘थोरली आई’ मध्ये एक वृद्ध विधवा स्त्री, नवर्‍याने सोडून दिलेल्या अर्थात परितक्त्या  स्त्रियांसाठी स्वतःच्या मालकीची जमीन त्यांच्या राहण्यासाठी गावाला देते, ‘व्याजाचा उंदीर’मध्ये दारूचे व्यसन आणि त्यातून झालेला कर्जबाजारीपणा यातून बाहेर काढणारे मित्र याची कथा सांगितली आहे. ‘तू नक्की इन्स्पेक्टर होशील’या कथेत शालेय जीवनात आपला मित्र पुढे नक्की इन्स्पेक्टर होईल असा अंदाज बांधणे व तो खरा ठरणे. विजय कदम हे विद्यार्थी दशेत असतानाच पोलीस इन्स्पेक्टर होण्यासाठीचे बीज त्यांच्यामध्ये रुजत होते. त्या बीजाचाच वटवृक्ष कसा झाला. तसेच मोठ्या पदावर जाण्यासाठी केवळ इच्छा असून चालत नाही हे त्यांच्या व्यक्तीमत्त्वातून दिसून येते. कोणतीही पोषक परिस्थिती नसताना स्वबळावर ते पोलीस खात्यात उच्च पदावर पोहचले त्यांचा हा आदर्श इतर तरुणांनी घ्यावा. हे लेखकाने खूप छान मांडले आहे. 

‘तणाव’मध्ये मनावरचा ताण वाढला म्हणजे वेड्यासारखे वागणे कसे वाढते आणि विश्वासात घेऊन जवळचा मित्र कसा ताण कमी करतो आणि तणावमुक्त करतो हे सांगितले आहे. ‘गवत्या’ कथेत म्हैशीचे रेडकू सुद्धा माणसांच्या प्रेमात किती अडकलेले असते…! त्यास दूरवरच्या बाजारात दुष्काळास्तव विकून आले तरीही ते धडपडत परत एकटेच घरी परतते हे दाखवून दिले आहे.

‘अद्भुत स्वप्न’ ही कथा एक प्रेम कथा असून ती लेखकाने चांगली रंगवली आहे. ‘अल्बम’ कथेत मुलीच्या जन्मास येण्याचा अपशकून म्हणून नोकरी गेली. हा वडिलांचा अपसमज आणि त्यातून दारू पिणे व मुलीचा तिरस्कार इत्यादी वाढतात. नंतर पत्नीचाच, एका स्त्रीचाच संसारास हातभार व पुढे सुरळीत समाधान अशी शिकवण दिली आहे. या सर्वच कथांचा सारांश मी या प्रस्तावनेत दिला तर तुम्ही वाचक मंडळी लेखक सुनील आसवले यांचे पुस्तक आपल्या संग्रही ठेवणार नाही. शेवटी फक्त दोनच कथांविषयी अगदी मोजकेच सांगतो.

त्यांची नुकतीच दैनिक नवा महाराष्ट्र मध्ये प्रसिद्ध झालेली ‘यमी’ नावाच्या म्हैशीने दुधाच्या रूपाने कशी मदत केलेली असते आणि त्याच मुलांसाठी ‘यमी’ला बाजारात विकावे लागते. तीच ‘यमी’ मालकिणीच्या प्रेमाखातर म्हातारी झाल्यावरसुद्धा पुन्हा विकत आणली जाते. आणि आपला मरणोन्मुख देह मालकिणीच्या दारात ठेवून नोकरीवर निघालेल्या मुलाला थांबविते व होणार्‍या रेल्वे अपघातापासून त्याला वाचविते. ग्रामीण जनता पशु धनास जीवापाड जपते. मुके प्राणी माणसांचा संसारच काय पण जीवही वाचवतात. म्हणून त्यांच्यावर प्रेम करण्याची शिकवण या कथेतून आपल्याला मिळते.

ज्या कथेचे शीर्षक या कथा संग्रहास दिले आहे त्या कथेविषयी थोडं सांगतो. ‘घडलं हे मात्र खरं होतं…!’ या कथेत लेखकाने भुताटकी सारख्या विषयाला हात घातला आहे. खेड्यात आजही थोड्याफार प्रमाणात हा प्रकार पाहायला मिळतो. लेखकाने हा प्रसंग स्वतः अनुभवला असून त्यांचे म्हणणे आहे की, घडलं हे मात्र खरं होतं…! या कथेविषयी मी लेखकाशी जेव्हा चर्चा केली तेव्हा अंधश्रद्धा,  अपसमजाकडे ही कथा वळते आहे. अंधश्रद्धेचे निर्मुलन करायचे असताना, हा प्रसंग खरेच घडला असे सांगणे योग्य आहे का…? असे विचारताच ते म्हणाले, “नाही साहेब, ती भुताटकी होती असे मी ठामपणे सांगत नाही. कदाचित ती टोकाची मानसिक अवस्था असेल पण तिच्या त्या वेळच्या शक्ती व हातवार्‍यावरून अनैसर्गिकच वाटत होती.”

या त्यांच्या सांगण्यावरून मी एक कयास बांधला की, खरेच हा प्रसंग घडला असणार; पण तो अतृप्त आत्म्याचा किंवा भुताटकीचा नाही तर विपर्यस्त, नवख्या, जंगली वातावरणात एका शहरी नवविवाहितेच्या भीतीग्रस्त मनाने खोल भीतीच्या गर्तेत घेतलेली उडी असावी. पूर्वीच्या कपोलकल्पित भुताखेतांच्या खेडूत कथा आणि त्यांचा मनावरचा पगडा आता विपर्यस्त नवख्या परिस्थितीत उफाळून वर आला असेल आणि मग तशी तिची मानसिक अवस्था झाली असेल. लेखकाने अंधश्रद्धे सारखा संदेश वाचकांच्यापर्यंत पोहचू नये याची काळजी कथेत घेतलेली दिसून येते. लेखक सुनील आसवले यांच्या शालेय वातावरणातल्या कथा अत्यंत सुरेख आहेत. परीक्षेचे पेपर्स मुलांना देण्याचा प्रसंग, बदली झाल्यानंतर नवीन जागा, नवीन वातावरण इत्यादीचे वर्णन या कथांमधून त्यांनी फार आकर्षक ढंगात मांडले आहे.

सुनील आसवले हे लेखक म्हणून मला जेवढे आवडतात तेवढेच माणूस म्हणूनही मला आवडतात. त्यांनी अडले-नडलेल्यांना वेळोवेळी केलेल्या सहाय्यांना आठवूनच त्या प्रसंगांना अनुसरून या कथा लिहिल्या आहेत. अडचणीत आलेल्यांना हातभार लावणे त्यांच्या स्वभावातच आहे. ‘विद्या विनयेनं शोभते’ या उक्तीप्रमाणे त्यांच्या ठायी नम्रता हा गुण भरलेला आहे हे खरे आहे.

ज्ञानी से ज्ञानी मिले तो, हो जाये दो-दो बात ।

अज्ञानी से अज्ञानी मिले तो, मिल जाये दो-दो लाथ ।।

हाच अनुभव या त्यांच्या कथांमधून आपणास मिळतो. हा कथासंग्रह वाचून त्यासाठी प्रस्तावना लिहिण्याचा प्रस्ताव कवितासागर पब्लिशिंग हाऊस, जयसिंगपूर या प्रकाशन संस्थेचे संस्थापक डॉ. सुनील दादा पाटील यांनी माझ्याकडे आणल्यामुळे मला या कथांच्या सानिध्यात जावे लागले आणि सुनील आसवले यांच्यासारखा एक लेखक या योगाने आपला मित्र झाला याहून फायदा तो कोणता…? त्यांच्याकडून अधिकाधिक, नेटके असेच लेखन घडावे ही अपेक्षा करून माझी ही प्रस्तावना मी थांबवतो.   

आबासाहेब मारूती सूर्यवंशी,

(माजी जिल्हाशिक्षणाधिकारी)

संपर्क: ९५५२२५६६९०, ९९७५८७३५६९ 


डॉ. सुनील दादा पाटील (Ph. D.) संचालक – कवितासागर साहित्य अकादमी, जयसिंगपूर प्रकाशक – कवितासागर पब्लिशिंग हाऊस, जयसिंगपूरसंपादक – मासिक कविता सागर – आंतरराष्ट्रीय मानक क्रम संख्या (आय एस एस एन) ISSN2349-0446Dr. Sunil Dada Patil (Ph. D.) 02322 – 225500, 09975873569, 08484986064

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
LinkedIn
INSTAGRAM