विश्वचि माझे घर—- प्राचार्य श्रीधर हेरवाडे, कोल्हापूर

पुस्तक परिचय

 

विश्वचि माझे घर म्हणजेच ब्रम्‍हविलासांचा प्रासादिक शब्‍दविलास

 

श्री. ब्रम्‍हविलास पाटील (जयसिंगपूर) यांनी, ज्‍योतिषशास्‍त्राचा अभ्‍यास चांगला केला आहे. याबरोबरच धर्मज्ञानाचेही सम्‍यग्ज्ञान त्‍यांना आहे. या दोन्ही शास्‍त्रासंबंधी त्‍यांनी आपल्‍या विश्वचि माझे घर’’, या पुस्‍तकाविषयी सुयोग्‍य लेखन केले आहे. तसेच डॉ. सुनील दादा पाटील (जयसिंगपूर) यांनी, आपल्‍या सुप्रसिध्द कवितासागर प्रकाशनसंस्‍थेतर्फे या पुस्‍तकाची उत्तम छपाई करून प्रकाशन केले. त्‍याबद्दल सुविद्य लेखक ब्रम्हविलास पाटील आणि कर्तव्यदक्ष प्रकाशक डॉ. सुनील दादा पाटील, या उभयतांना मी मनापासून धन्यवाद देतो.

 

बालवयात लेखकाला, विशेषतः देवाविषयी अनेक प्रश्न पडत. देव कसा आहे? तो कुठं राहतो? दगडाच्या मूर्तीत किंवा देवळात देव आहे का? मनुष्‍य मेल्‍यावर तो कुठं जातो? . अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा त्‍यांनी प्रयत्‍न केला; पण उचित म्‍हणजे मनासारखे उत्तर मिळालं नाही. मानवी मन हे मर्कटासारखं चंचल आहे. बहिणाबाई चौधरी चंचल मनाचं वर्णन करताना म्‍हणतात

 

       ‘मन वढाय वढाय उभ्‍या पिकातलं ढोर ।….

       आता हुतं भुईवर मग जाय वरवर ।…..’

 

आपल्‍या अज्ञानाला दूर केल्‍याशिवाय, दुःख दूर पळणार नाही. असं लेखकाला वाटतं. यासाठी कोऽ हं? मी कोण? Who am I? याचा चिंतनात्‍मक विचार केला पाहिजे. स्‍वाध्यायामधूनच याचं उत्तर मिळेल. कारण स्‍वाध्यायः परमं तपः।म्हणजे वाचनापृच्छनादी पाच प्रकारच्या आहेत. स्‍वाध्याय, हे श्रेष्‍ठ तप आहे.

 

धर्म म्‍हणजे सुख आणि अधर्म म्‍हणजे दुःख, हे समीकरण नेहमी लक्षात ठेवावं! असा लेखकाचा आग्रह आहे; तो योग्‍य आहे. कारण वत्‍सुस्‍वभावो धम्‍मो।नांगी मारणं हा विंचवाचा स्‍वभाव, तो कसा बदलेल? ‘धर्मस्‍य मूलं दया।या शिकवणीप्रमाणे माणुसकी हा मानवाचा धर्म नव्हे काय? म्‍हणून एक हिंदी कवी म्‍हणतो,

 

       ‘धर्म धर्म सब कोइ कहे, धर्म न जाणे कोय।

       धर्म मर्म जाणे बिना, धर्म कहाँ से होय?’

 

धारयति इति धर्मः।आपण जे धारण करतो, तो धर्म असं सर्वपल्‍ली डॉ. राधाकृष्‍णन म्‍हणतात.

 

       ‘अहिंसा परमो धर्मः अहिंसैव परं तपः।

       अहिंसा परमं दानं इत्‍याहुः मुनयः सदा।।

 

असा हा अहिंसा श्रेष्‍ठ धर्म आहे; श्रेष्‍ठ तप आणि सर्वश्रेष्‍ठ दान सुध्दा आहे, असं साधुसंत नेहमी सांगतात. ‘सव्वे जीवा विद्रच्छन्ति जीविॐ, न मरिज्‍जिॐ।म्‍हणजे सर्व जीवांना जगावंसंच वाटतं, मरावंसं कुणालाच वाटत नाही. ‘सत्‍यापरता नाही धर्म। सत्‍य तेचि परब्रह्म।असा महात्‍मा फुले सत्‍याचाच नेहमी पुरस्‍कार करीत. अहिंसा सत्य, अस्‍तेय, अपरिग्रह व ब्रह्मचर्य ही जिनधर्मामध्ये श्रावकांसाठी अणुव्रते व त्‍यांगीसाठी महाव्रते आहेत. ‘‘मानवी जीवन हे खरोखरच अतिशय सुंदर आहे; पण तो सुखानं भरलेला पेला नसून, कर्तव्यानं भरलेलं माप आहे’’ असं पंडित जवाहरलाल नेहरू म्‍हणतात, ते अगदी बरोबर आहे.

 

आनंद आपल्‍या अंतरात्‍म्‍यामध्ये लपून बसलेला असतो. तो आपण शोधला पाहिजे. यासाठी आनंदानं जगावं कसं? याचा सुंदर आणि सोपा मार्ग लेखकानं सांगितला आहे. समर्थ रामदासांच्या भाषेत सांगायचं झाल्‍यास

 

       ‘मन करा रे प्रसन्न । सर्व सिध्दीचे कारण ।।

 

वास्‍तविक आपल्‍या सुखदुःखाला आपणच कारणीभूत असतो. म्‍हणून वामनराव पै चिंतन आणि चिंतामणीया कार्यक्रमातून निरूपण करताना म्‍हणतात – ‘‘तूच तुझ्या जीवनाचा शिल्‍पकार आहेस.’’ भगवद्गीता आपल्‍याला हेच सांगते

 

सुखस्‍य दुःखस्‍य न कोऽपि दाता ।

       परो ददातीति कुबुध्दि रेषा ।।

       अहं करोमीति वृथाभिमानः ।

       स्‍वकर्म सूत्रग्रथितोहि लोकः ।।

       मी पण ज्‍यांचे पक्‍व फळापरि,

सहजपणाने गळले हो।

       जीवन त्‍यांना कळले हो ।।

 

असं कवी बा. . बोरकर म्‍हणतात, ते अगदी बरोबर आहे. ‘ज्‍याचा अहंकार गेला। तो देवचि झाला।।असं साधुसंत सांगतात.

 

दर्शनं देवदेवस्‍य दर्शनं पापनाशनम्‌।

       दर्शनं स्‍वर्गसोपानं दर्शनं मोक्षसाधनम्‌।।

 

नित्‍यदेवदर्शन हे जसे मोक्षप्राप्तीचे साधन आहे; तसं आचार्य उमास्‍वामी आपल्‍या तत्‍वार्थसूत्रग्रंथामध्ये, पहिल्‍याच सूत्रात सम्‍यग्‍दर्शन ज्ञान चारित्राणि मोक्षमार्गः।हा मोक्षाचा मार्ग सांगतात.

 

अमेरिकेतील शिकागो येथे १८९३ साली जागतिक सर्वधर्म परिषदभरली होती. तेव्हा त्‍या सभेमध्ये ‘Ladies and Gentleman’ अशी साचेबंद कृत्रिम सुरुवात न करता, ‘My dear brothers and sisters’  अशी भावपूर्ण सुरुवात करून, स्‍वामी विवेकानंदानी टाळ्यांच्या प्रचंड गजरात ती परिषद जिंकली होती. त्‍याच परिषदेमध्ये जैन धर्मीयांचे प्रतिनिधीत्‍व करण्यासाठी गेलेल्‍या, बॅरिस्‍टर वीरचंद राघोबा गांधी यांनी, ‘जगा आणि जगू द्याही भगवान महावीरांची शिकवण आणि सत्‍य अहिंसेसंबंधीचे जैन धर्मीयांचे तत्त्वज्ञान, यांचा प्रभावी ठसा उमटविलेला होता.

 

माणसानं आपल्‍या उतार वयामध्ये क्रोधावर विजय मिळवणे म्‍हणजे सर्व रोगांवर विजय मिळवल्‍यासारखं आहे.’ निसर्ग माणसाला खूप काही शिकवतो. म्‍हणूनच म्‍हणतात– ‘Nature is the best Teacher!’ याचा आपणांस नेहमी अनुभव येतो.

 

श्री. ब्रह्मविलास पाटील यांनी, या पुस्‍तकातून ज्योतिषशास्‍त्राबरोबरच अध्यात्‍मशास्‍त्राचाही उत्तम शब्‍दविलाससाधलेला आहे; त्‍याबद्दल त्‍यांना द्यावेत तेवढे धन्यवाद थोडेच आहेत. या पुस्‍तकात रामायण व महाभारतातील तथा भ. महावीर, गौतम बुध्द, गणपती इ. संबंधींचे संदर्भ देऊन, त्‍यांनी थोडक्‍यामध्ये काही दृष्‍टांत कथाही सांगितल्‍याने, या पुस्‍तकाला बहुश्रुतत्‍वही आले आहे. पुस्‍तकाची भाषा व कोष्‍टके ज्‍योतिष जाणणार्‍यांना सहज सुलभ समजणारी आहेत. इतर विषयांसंबंधीचे त्‍यांचे लेखन आबालसुबोध झाले आहे. अनेक स्‍वरूपात धार्मिक विचारांचे दर्शन, ‘गागर मे सागरया रुपामध्ये घडविल्‍यामुळे निश्चितपणे श्री. ब्रह्मविलास हे शतशः धन्यवादास पात्र आहेत.

 

– प्राचार्य श्रीधर हेरवाडे, कोल्हापूर

 

 

·       पुस्तकाचे नांव – विश्वचि माझे घर

·       लेखक – ब्रम्हविलास पाटील

·       प्रस्तावना – डॉ. अजित पाटील, सांगली  

·       प्रकाशन – कवितासागर प्रकाशन, जयसिंगपूर

·       प्रकाशक – डॉ. सुनील दादा पाटील

·       पृष्ठे – २१६

·       स्वागत मूल्य – २५०/-

·       संपर्क – 02322 225500, 9975873569

·       ईमेल – sunildadapatil@gmail.com

·       ईबूक http://www.readwhere.com/read/1151523/Vishwachi-Maze-Ghar-

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Facebook
Twitter
LinkedIn
INSTAGRAM